
संघटन कौशल्य, समाजसेवा आणि शेतकरीहितासाठीच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव; प्रा. रमेश बारसागडे यांना ‘लोकमत गडचिरोली भूषण’ पुरस्काराने सन्मानित!
जनतेशी नाळ जपणाऱ्या नेतृत्वाचा गौरव; गडचिरोलीच्या भूमिपुत्राचा नागपूरात अभिनेते मकरंद अनासपुरे व राज्यमंत्री मा. पंकज भोयर यांच्या हस्ते ‘ ‘लोकमत गडचिरोली भूषण’ पुरस्कार प्रदान
नागपूर / गडचिरोली | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. रमेश बारसागडे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, संघटनात्मक आणि शेतकरीहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘लोकमत गडचिरोली भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. २७ जून रोजी नागपूर येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पंकजजी भोयर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात प्रा. बारसागडे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
प्रा. रमेश बारसागडे यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या मेहनतीच्या, प्रामाणिकपणाच्या आणि संघटन कौशल्याच्या बळावर राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. एका साध्या वार्डातील कार्यकर्त्यापासून सुरुवात करत त्यांनी संघटनेतील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आणि आज भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यांचा हा प्रवास अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे.
राजकारणाबरोबरच समाजकारणातही त्यांनी नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विशेषतः शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भूमिका घेतली. शेतीविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्या शासनाच्या पातळीवर मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी अनेक वर्षांपासून केले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांचे नुकसान, बाजारभाव, साठवणूक सुविधा, सिंचन आणि कृषी विकास यासंदर्भात त्यांनी सातत्याने आवाज उठविला असून त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे अनेक प्रश्न शासनाच्या अजेंड्यावर आले.
लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुणघाडा ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, कुणघाडा-तळोधी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य आणि नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे कृषी सभापती म्हणून त्यांनी प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली. आपल्या कार्यकाळात जिल्हा परिषद क्षेत्रात रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक विकासकामे मार्गी लावून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.
कृषी सभापती म्हणून कार्यरत असताना शेतकऱ्यांना पिकांची सुरक्षित साठवणूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कृषी गोदामांच्या उभारणीला गती मिळाली. ही सुविधा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे आजही कौतुक केले जाते.
सध्या ते चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही कार्यरत असून शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील समन्वय साधत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांचा शांत, संयमी आणि सर्वसमावेशक स्वभाव, तसेच कोणत्याही विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची हातोटी यामुळे ते सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत.
संघटन कौशल्य, ग्रामीण विकासासाठीची तळमळ, शेतकरी हितासाठी सातत्याने केलेला संघर्ष आणि समाजाशी असलेली नाळ यामुळे प्रा. रमेश बारसागडे यांनी अल्पावधीतच जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘लोकमत गडचिरोली भूषण’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा. रमेश बारसागडे यांनी संघटन विस्ताराला विशेष गती दिली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे, बूथ सशक्तीकरण, शक्तिकेंद्र बळकटीकरण, सदस्य नोंदणी अभियान, सेवा उपक्रम आणि विविध जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियमित दौरे करून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि सर्वांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून लोकहिताच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आणि ठाम भूमिका घेत प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या शांत, संयमी, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद जिल्ह्यात अधिक भक्कम झाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आणि सन्मान प्राप्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, शेतकरी, मित्रपरिवार तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून प्रा. रमेश बारसागडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.








