
बांधकाम कामगारांनी नोंदणी व नूतनीकरण करून घ्यावे; दलालांच्या आमिषाला बळी पडू नका
कल्याणकारी योजनांचे लाभ थेट बँक खात्यात; सर्व सेवा पूर्णपणे नि:शुल्क
दिं 11/06/2026
गडचिरोली: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, पात्र बांधकाम कामगारांनी वेळेत नोंदणी व नूतनीकरण करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.
विभागाच्या माहितीनुसार, नोंदणी, नूतनीकरण आणि विविध लाभ योजनांचे अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून छाननी करून मंजुरी किंवा नामंजुरीचा निर्णय घेतला जातो. अर्जाची स्थिती संबंधित कामगारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येते.
मंडळाकडून मिळणारे सर्व आर्थिक व कल्याणकारी लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही तसेच कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेमार्फत अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणी पैशाची, कमिशनची किंवा लाचेची मागणी करत असल्यास संबंधितांविरुद्ध तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करता येणार आहे.
📞 तक्रारींसाठी नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक १०६४ उपलब्ध असून ई-मेलद्वारेही तक्रार नोंदविता येईल.
कामगारांनी कोणत्याही आमिषाला किंवा फसवणुकीला बळी न पडता स्वतः अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पात्र बांधकाम कामगारांसाठी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित नियोक्ता, ठेकेदार किंवा अधिकृत अधिकाऱ्यांनी देणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचावा यासाठी नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन कामगार विभागाने केले आहे.








