Home गडचिरोली कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीसाठी २५ मे रोजी ‘डफरे बजाओ’ आंदोलन

कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीसाठी २५ मे रोजी ‘डफरे बजाओ’ आंदोलन

0
25

 


 कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीसाठी २५ मे रोजी ‘डफरे बजाओ’ आंदोलन

आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अरविंदभाऊ कात्रटवार मित्र परिवाराचे आवाहन

गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २, गडचिरोली येथील कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात सोमवार, २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ‘डफरे बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अरविंदभाऊ कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरची तालुक्यातील नाडेकल–बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे ५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पूल रहदारी सुरू होण्यापूर्वीच कोसळला. या पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केला आहे.

तसेच, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते व पुल दुरुस्तीच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी कामे न करताच बिले काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मागील तीन वर्षांत तब्बल ५ हजार कामांच्या निविदा नियमबाह्य पद्धतीने काढून ती कामे मजूर सहकारी संस्थांना २० टक्के कमिशनवर विकण्यात आल्याचाही आरोप कात्रटवार यांनी केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात रस्ते व पुलांच्या निकृष्ट कामांद्वारे भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, तसेच नाडेकल येथील कोसळलेल्या पुल प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समितीद्वारे चौकशी करून शासकीय निधीची वसुली करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

“कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!