
गडचिरोली शहर मंडल ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’चा भव्य शुभारंभ: कार्यकर्ता म्हणजे समाजपरिवर्तनाचा शिल्पकार_
जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे
गडचिरोली | प्रतिनिधी :
गडचिरोली शहरातील नगर भवन आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाने, घोषणांनी आणि संघटनात्मक उर्जेने अक्षरशः दुमदुमून गेले. ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’चा भव्य शुभारंभ जिल्हाध्यक्ष प्रा. श्री. रमेशजी बारसागडे यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्याने केवळ एका प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली नसून, जिल्ह्यातील भाजप संघटनाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रस्तावनेत प्रशिक्षणाचे उद्दिष्ट, स्वरूप आणि आगामी निवासी होणाऱ्या विविध सत्रांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण पूर्णपणे निवासी आयोजित करण्यात आले असून, कार्यकर्ते दोन दिवस एकत्र राहून शिस्तबद्ध वातावरणात अभ्यास, चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण करत आहेत. त्यामुळे प्रशिक्षण अधिक परिणामकारक ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या महाअभियानात कार्यकर्त्यांना विचारधारा, संघटन कौशल्य, जनसंपर्क, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, तसेच समाजाशी संवाद साधण्याच्या आधुनिक पद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. निवासी पद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एकात्मता, समन्वय आणि संघभावना अधिक दृढ होत असल्याचेही दिसून येत आहे.
जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांनी आपल्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणातून कार्यकर्त्यांना नवी दिशा दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा फक्त राजकारण करणारा व्यक्ती नसून तो समाजाच्या परिवर्तनाचा शिल्पकार आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, हीच खरी कार्यकर्त्याची ओळख आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेले ‘अंत्योदय’ तत्वज्ञान हेच भाजपचे मूळ तत्त्व आहे. या तत्वज्ञानाच्या माध्यमातून समाजातील सर्वात दुर्बल, वंचित आणि शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात आणणे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. “आपण केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करतो,” असे ठामपणे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक जबाबदारीने आणि समर्पणाने काम करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षण महाअभियानात कार्यकर्त्यांच्या वैचारिक अधिष्ठानाला बळकटी देण्यासाठी विविध विषयांवर सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. संघटन बांधणी, बूथ व्यवस्थापन, निवडणूक रणनीती, सोशल मीडिया वापर, तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे कार्यकर्ते अधिक सक्षम, सजग आणि परिणामकारक पद्धतीने काम करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी खासदार तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जमाती) डॉ. अशोकजी नेते, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, नगराध्यक्षा अॅड. प्रणोतीताई निंबोरकर, शहर अध्यक्ष तथा बां सभापती अनिल कुनघाडकर यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शहरातील पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना प्रेरित केले आणि संघटन अधिक मजबूत करण्याचा संदेश दिला.
संपूर्ण कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह, शिस्त आणि पक्षनिष्ठा स्पष्टपणे दिसून येत होती. निवासी प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक जवळीक, समन्वय आणि कार्यक्षमतेची भावना निर्माण होत असल्याचे वातावरणात जाणवत होते.
या प्रशिक्षण महाअभियानामुळे गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक सक्षम आणि व्यापक होणार असून, आगामी काळात पक्षाची ताकद आणखी वाढेल, असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी व्यक्त केला.
एकूणच, ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ हा निवासी स्वरूपातील उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता कार्यकर्त्यांच्या मनात नवी उमेद, नवी प्रेरणा आणि समाजसेवेची जाज्वल्य भावना निर्माण करणारा ऐतिहासिक टप्पा ठरला.








