Home गडचिरोली गडचिरोली–धानोरा महामार्ग धुळीच्या धुक्यात गडप; अपघातांची साखळी सुरूच – निष्काळजी कंत्राटदारांवर तात्काळ...

गडचिरोली–धानोरा महामार्ग धुळीच्या धुक्यात गडप; अपघातांची साखळी सुरूच – निष्काळजी कंत्राटदारांवर तात्काळ कारवाईची मागणी तीव्र

0
23

गडचिरोली–धानोरा महामार्ग धुळीच्या धुक्यात गडप; अपघातांची साखळी सुरूच – निष्काळजी कंत्राटदारांवर तात्काळ कारवाईची मागणी तीव्र

 

गडचिरोली–धानोरा राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले बांधकाम आता नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गडचिरोलीपासून अवघ्या ४ ते ५ किमी अंतरावर असलेल्या बोदली परिसरात रस्त्याचे काम सुरू असून, संपूर्ण मार्ग दिवसभर धुळीच्या प्रचंड ढगात हरवून जात आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिवसाढवळ्या एवढी धूळ उडते की समोरून येणारे वाहन १०–१५ फुटांवरही दिसत नाही. त्यामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकताच बोदली गावाजवळ, बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत आहे.

स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आला असून, “हा अपघात नव्हे, तर कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे घडणारे मृत्यू आहेत,” असा थेट आरोप केला जात आहे. यापूर्वीही या मार्गावर अनेक गंभीर अपघात झाले आहेत; मात्र प्रशासन आणि संबंधित यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महामार्गावर खनिज, लोखंड, लाकूड, रेती, गिट्टी वाहून नेणारी जड वाहने दिवसरात्र धावत असल्याने धुळीचे प्रमाण आणखी वाढले आहे. यामुळे केवळ अपघातांचा धोका नव्हे, तर श्वसनाच्या आजारांचा धोका देखील नागरिकांवर घोंगावत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, कामाच्या ठिकाणी कोणतीही मूलभूत सुरक्षा उपाययोजना दिसत नाही. पाणी शिंपडणे नाही, इशारा फलक नाहीत, वेग मर्यादा नाही – अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात घालून महामार्गाचे काम सुरू असल्याची तीव्र टीका होत आहे. “आणखी किती निष्पाप बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित कंत्राटदारांवर तात्काळ कठोर कारवाई करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आता तीव्र झाली आहे.

 

दरम्यान, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली नाही, तर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!