
कोटगल येथे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात
सामाजिक कार्यासाठी नवनाथ उके यांचा सत्कारमूर्ती म्हणून सन्मान; महिलांच्या योगदानावर प्रेरणादायी मार्गदर्शन
गडचिरोली:सामाजिक विचारमंच कोटगल व बौद्ध समाज कोटगल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त माँ जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते नवनाथ उके यांचा सत्कारमूर्ती म्हणून सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आला. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात समाजकार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान होत असल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ममताताई दुधबावरे (सरपंच, ग्रामपंचायत कोटगल) होत्या. उद्घाटक म्हणून मा. अर्चनाताई खोब्रागडे (सामाजिक कार्यकर्त्या, गडचिरोली) तर सहउद्घाटक म्हणून मा. मोहिनीताई ठाकरे (सामाजिक कार्यकर्त्या) उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. विनोद चव्हाण (पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली) उपस्थित होते.
यावेळी मंचावर यशोदा आगेवार मॅडम, लताताई मेश्राम मॅडम, पूजा ताई नैताम (महिला पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली), अस्मिता लाडे मॅडम, ज्योतीताई मेश्राम मॅडम, नरोटे मॅडम, मोहनभाऊ ठाकरे, हेमंत पाटील मेश्राम, दिवाकरजी भोयर (माजी जिल्हा परिषद सदस्य), विजय मोसवार, वसंत मेडेवर, विजय गददेवर, डॉ. धमदीप बडोले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रवृत्ती राहुल वाळके मॅडम (विहार समन्वयक, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) तसेच मा. ममताताई शेंडे (सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, गडचिरोली) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी आयोजित डान्स स्पर्धेचे निरीक्षक म्हणून ॲड. सोनाली मेश्राम, मोनाली देवतले व विभाताई उमरे यांनी काम पाहिले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नवनाथ उके यांनी कोटगल येथील बौद्ध समाज बांधवांचे आभार मानले. “अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील एका सामान्य सामाजिक कार्यकर्त्याला इतक्या मानाने सत्कारमूर्ती म्हणून सन्मानित करण्यात आले, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी बाब आहे. या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधारवड नसून समाजाच्या प्रगतीला दिशा देणारी प्रेरणादायी शक्ती आहे. कधी शौर्याची ढाल तर कधी मायेची उबदार शाल बनून स्त्री कुटुंब व समाजाला बळ देत असते. इतिहासातील अनेक महान स्त्रियांनी आपल्या त्याग, धैर्य व नेतृत्वातून समाजाला नवी दिशा दिली आहे. आज महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात पुढे जात असून देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येत समाजनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात गावातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








