Home गडचिरोली नगराध्यक्ष अॅड प्रणोती निबोंरकर यांचा शिवरायांच्या विचारांनी प्रेरित जनसेवेचा निर्धार ;गडचिरोली नगर...

नगराध्यक्ष अॅड प्रणोती निबोंरकर यांचा शिवरायांच्या विचारांनी प्रेरित जनसेवेचा निर्धार ;गडचिरोली नगर परिषदेत शिव जयंती उत्साहात साजरी

0
27

नगराध्यक्ष अॅड प्रणोती निबोंरकर यांचा शिवरायांच्या विचारांनी प्रेरित जनसेवेचा निर्धार ;गडचिरोली नगर परिषदेत शिव जयंती उत्साहात साजरी

स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, लोककल्याणकारी शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन

दि. 19/02/2026

गडचिरोली: गडचिरोली नगर परिषदेत आज हिंदवी स्वराज्याचे प्रणेते, अद्वितीय शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगर परिषद परिसर आकर्षक फुलांची सजावट, आणि “जय शिवराय”च्या घोषणांनी शिवमय झाला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष अँड प्रणोती सागर निबोंरकर व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित विचार मांडण्यात आले तसेच त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा उल्लेख करण्यात आला.

नगराध्यक्ष अँड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पराक्रमी राजे नसून ते सुशासन, स्त्री सन्मान आणि लोककल्याणकारी प्रशासनाचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांनी सर्व धर्मांचा आदर राखत न्यायपूर्ण राज्य उभारले. आजच्या काळात पारदर्शक, जबाबदार आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करणारी व्यवस्था उभी करणे हीच त्यांना खरी अभिवादन ठरेल. गडचिरोली नगर परिषद नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, शिवरायांच्या आदर्शांचा मार्गदर्शक म्हणून आम्ही कार्यरत आहोत.”

तसेच त्यांनी युवकांना आवाहन केले की, शिवरायांच्या शौर्य, धैर्य, संघटन कौशल्य आणि राष्ट्रप्रेमातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी पुढे यावे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला.

नगरसेवक व नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने शिवरायांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी “जय शिवराय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. गडचिरोली नगर परिषदेतर्फे सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि शिवरायांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!