Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर केशवराव भांडेकर यांची स्वर्गीय नायरा...

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर केशवराव भांडेकर यांची स्वर्गीय नायरा तानाजी कुकडकर यांच्या कुटुंबाला सांत्वन भेट

0
21

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर केशवराव भांडेकर यांची स्वर्गीय नायरा तानाजी कुकडकर यांच्या कुटुंबाला सांत्वन भेट

प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव महाल येथे आकस्मिक पाहणी

गडचिरोली: आमगाव महाल येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी सर्पदंश प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नायरा तानाजी कुकडकर ही चिमुकली दि. १३/२/२०२६ रोजी दुपारी सुमारे २:३० वाजताच्या सुमारास अंगणात खेळत असताना सापाने दंश केला. घटनेची माहिती तिने तत्काळ आई-वडिलांना दिल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, आमगाव येथे उपचारासाठी दाखल केले.

मात्र, तेथील कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर हेंद्रे यांनी योग्य तपासणी व तातडीचा उपचार न करता तिला रेफर करून चामोर्शी येथे पाठविल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. चामोर्शी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिची प्रकृती गंभीर झाली आणि रुग्णालयात पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात संताप व शोककळा पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष  मधुकर केशवराव भांडेकर यांनी स्वर्गीय नायरा हिच्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दु:खी कुटुंबीयांना धीर देत त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, आमगाव येथे आकस्मिक भेट देत तेथील आरोग्य सेवांचा आढावा घेतला. संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सर्पदंशासारख्या गंभीर प्रकरणात तातडीने उपचार, अँटी-स्नेक व्हेनमची उपलब्धता आणि जबाबदारीने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.

भांडेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आरोग्य सेवेतील निष्काळजीपणामुळे एका निरपराध चिमुकलीचा जीव गमवावा लागला असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. दोषी आढळणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करू.”

उपस्थित तानाजी कुकडकर व गावातील नागरिकांना त्यांनी विश्वास दिला की, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील.

या वेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून निष्पाप नायराला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!