Home गडचिरोली भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संगम : राजनगट्टा

भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संगम : राजनगट्टा

0
11

भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संगम : राजनगट्टा

भक्तीनामात दुमदुमली राजनगट्टा नगरी

गडचिरोली |  चामोर्शी तालुक्यातील राजनगट्टा येथे ह. भ. प. स्व. वातुजी महाराज कोहळे व गीताई कोहळे यांच्या पवित्र स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदेचे औचित्य साधून दोन दिवसीय भव्य धार्मिक, सामाजिक  कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील परिसर भक्तीनाम, हरिनाम गजर व अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ह. भ. प. दत्तात्रय महाराज क्षीरसागर (उराडी) यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून विधीवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ व नामस्मरण कार्यक्रम पार पडला. सायंकाळी राजनगट्टा, वालसरा, भिवापूर, कुंभारवाही, आमगाव, रेखेगाव, जाणाळा आदी पंचक्रोशीतील विविध भजन मंडळांनी आपल्या मधुर वाणीतून, भजन व हरिनाम गजरात सामूहिक जागरण घडवून आणले. या जागरणातून भक्तीबरोबरच समाजात सद्भावना, एकोपा व संस्कारांची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वच्छ गाव – सुंदर गाव या संकल्पनेतून ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिक ग्रामस्वच्छता अभियान राबवले. पुढे पारंपरिक पालखी सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. या प्रसंगी ह. भ. प. प्रणालीताई पीपरे यांच्या प्रभावी कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करण्यात आले. त्यांनी आपल्या कीर्तनातून गुरूभक्ती, माणुसकी, व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य व नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सांगता पारंपरिक गोपालकाला व महाप्रसाद वितरणाने करण्यात आली.
या सोहळ्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अनिल कोठारे, राजेश ठाकूर, निकेश गद्देवार, रवींद्र पाल, गौरव येनप्रेड्डीवार यांच्यासह ह. भ. प. माधव महाराज चौधरी (उराडी) व ह. भ. प. कार्तिक महाराज कोकोडे (उराडी), ह. भ. प. वासेकर महाराज, ह. भ. प. हिराजी सातपुते महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत अशा उपक्रमांतून सामाजिक एकात्मता व संस्कृतीचे जतन होते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंत कोहळे, लोमेश सातपुते, गोकुळ कोहळे, वासुदेव दूधबावरे, श्रीराम सातपुते, भाऊजी चलाख, बाबुराव भांडेकर, भाऊजी सोमणकर, नीलकंठ गव्हारे, देवानंद जुवारे, दर्शना जुवारे, लिंगाजी कोपूलवार, अनुप कोहळे यांच्यासह राजनगट्टा, वालसरा व कुंभारवाही येथील सर्व ग्रामस्थांनी  परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!