Home गडचिरोली नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे कठाणी नदी स्मशानभूमीची दुरवस्था!नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची पाहणी

नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे कठाणी नदी स्मशानभूमीची दुरवस्था!नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची पाहणी

0
16

नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे कठाणी नदी स्मशानभूमीची दुरवस्था!नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची पाहणी!

 

 

अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा कमी पडू देणार नाही — ठाम निर्धार

 

गडचिरोली :गडचिरोली शहरातील आरमोरी रोडवरील कठाणी नदी परिसरात असलेली स्मशानभूमी नगर परिषदेच्या दीर्घकाळच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता व अपुऱ्या सुविधांच्या विळख्यात अडकली होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने व तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

पाहणीदरम्यान पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नसणे, शौचालयांची अपुरी सुविधा, अंत्यविधीसाठी आवश्यक सोयींचा अभाव तसेच परिसरातील अस्वच्छता स्पष्टपणे दिसून आली. नागरिकांच्या दुःखाच्या क्षणी मूलभूत सुविधांचा अभाव हे गंभीर असून, अशा प्रकारचे दुर्लक्ष यापुढे खपवून घेतले जाणार नाही, अशी ठाम व आक्रमक भूमिका नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मांडली.

 

स्मशान घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर पसरलेली माती, ठिकठिकाणी साचलेला कचरा व घाण पाहून संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ साफसफाईचे सक्त आदेश देण्यात आले. परिसर स्वच्छ, सुरक्षित व सन्मानजनक ठेवण्यासाठी नियमित देखरेख आणि जबाबदारी निश्चित केली जाईल, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

 

स्मशानभूमी हा अत्यंत संवेदनशील व नागरिकांच्या भावनांशी निगडित असलेला परिसर असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मान, सुविधा व स्वच्छ वातावरण मिळणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे, असे नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी ठाम शब्दांत सांगितले. तर नगरसेवक सागर निंबोरकर यांनीही सर्व कामे प्राधान्याने, वेळेत व दर्जेदार पूर्ण केली जातील, अशी ठोस भूमिका मांडली.

 

या पाहणीदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पिंदुरकर, जे. ई. खामनकर तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

 

नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर आता नगराध्यक्ष व नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेतल्याने, स्मशानभूमीतील सुविधा व स्वच्छतेबाबत ठोस आणि प्रत्यक्ष बदल घडतील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!