
चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान घोडारथ यात्रेत नगरसेवक सागर निंबोरकर यांची विशेष उपस्थिती!
गडचिरोली | दि. ०१ फेब्रुवारी २०२६ :
चिमूर येथील प्रसिद्ध श्रीहरी बालाजी देवस्थानाची पारंपरिक घोडारथ यात्रा मोठ्या भक्तिभावात, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडली. श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेल्या या यात्रेत गडचिरोली शहराचे नगरसेवक सागर निंबोरकर यांनी विशेष उपस्थिती लावून श्रीहरी बालाजीचे दर्शन घेतले व भाविकांसोबत यात्रेचा आनंद अनुभवला.
या भव्य घोडारथ यात्रेला भाजपचे आमदार बंटी भांगडिया, माजी खासदार अशोकजी नेते, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, डॉ. दिलीप शिवरकर सामाजिक कार्यकरते अभिजीत कोरडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे यात्रेच्या शोभेत व महत्त्वात विशेष भर पडली.
यात्रेदरम्यान आमदार बंटी भांगडिया यांनी पदाधिकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेतली. यावेळी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींमधील संवाद अधिक दृढ होत असून, त्यातून विकासाला नवी दिशा मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
नगरसेवक सागर निंबोरकर यांनी देवदर्शनानंतर भाविकांशी संवाद साधत पारंपरिक धार्मिक उत्सव समाजात एकता, आपुलकी आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्याचे कार्य करतात, असे मत व्यक्त केले.
श्रीहरी बालाजी देवस्थानाची घोडारथ यात्रा ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून सामाजिक एकोपा आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली. यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर ‘जय श्रीहरी बालाजी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.








