
विसोरा येथे ‘अंधारातील लाल दिवा’ नाटकाचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात संपन्न
वडसा तालुक्यातील विसोरा येथे शंकरपटा निमित्त एकता नाट्य कला मंडळ, विसोरा यांच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या ‘अंधारातील लाल दिवा’ या सामाजिक नाटकाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे, काँग्रेस तालुका अध्यक्ष परसराम टिकले, नगरपरिषद उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, आकाश अग्रवाल, नाना नाकाडे, नितीन नाकाडे, कुरखेडा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बबलू हुसैनी, राजू जेठानी (नगरसेवक, वडसा), मुरलीधर सुंदरकर, माजी सरपंच ॲड. प्रमोद बुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी ग्रामीण भागात शंकरपट हे पारंपरिक मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितले. नाटकाच्या माध्यमातून सामाजिक व घरगुती प्रबोधन घडते, तसेच समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावी संदेश दिला जातो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकता नाट्य कला मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.








