
महिला महाविद्यालय व फुले आंबेडकर कॉलेजतर्फे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026 उत्साहात संपन्न
गडचिरोली: गडचिरोली येथील महिला महाविद्यालय, गडचिरोली आणि फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026 अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व क्रीडा कौशल्यांना वाव देणारा हा महोत्सव महाविद्यालयीन जीवनात ऊर्जा व प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
या महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला असून, विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी आपली कला व कौशल्ये प्रभावीपणे सादर केली.
महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी गडचिरोली नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून, कला, संस्कृती आणि क्रीडेमधून व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, शिस्त व सामाजिक जाणीव निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल भाष्य करत, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष, समाजातील रूढी-परंपरांविरुद्ध लढा आणि शिक्षणातून समाजपरिवर्तनाची भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडली. सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महोत्सवाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य, गीत, वकृत्व, एकांकिका तसेच विविध क्रीडा स्पर्धांनी संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्राध्यापक, मान्यवर व प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ, संघभावना, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे मत प्राध्यापक वर्गाने व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळून त्यांचे सुप्त गुण विकसित होतात, असेही आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला महाविद्यालय व फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या प्राचार्य, प्राध्यापक, सांस्कृतिक व क्रीडा विभाग, तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.








