
रिंग रोडसाठी तातडीने मंजुरी द्या – नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांची सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्याकडे ठोस मागणी!
गडचिरोली शहराचा विकासासाठी निर्णायक पाऊल
दिं.26/01/2026
गडचिरोली: गडचिरोली शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि वाढते अपघात यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून *रिंग रोड प्रकल्प तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करावी,* अशी ठाम व आग्रही मागणी *नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर* यांनी केली. यासंदर्भात त्यांनी गडचिरोलीचे सहपालकमंत्री *अॅड. आशिष जयस्वाल* यांची सदिच्छा भेट घेऊन शहराच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांनी अत्यंत भावनिक व ठाम शब्दांत सांगितले की,
*“माझ्या पदापेक्षा माझ्यासाठी गडचिरोली शहर व जिल्ह्यातील नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. वाढते अपघात, वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांचे प्राण धोक्यात येत असतील, तर ते थांबवणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.”*
नगराध्यक्षा निंबोरकर यांनी पुढे सांगितले की, गडचिरोली शहरात गेल्या काही *वर्षांत लोकसंख्या व वाहनसंख्या झपाट्याने वाढली असून शहरातील मुख्य रस्ते अत्यंत अरुंद* आहेत. परिणामी, शहरातून जाणारी अवजड वाहतूक, अपुरे वाहतूक नियोजन आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे *अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.* नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता *रिंग रोड हा अत्यावश्यक व तातडीचा प्रकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.*
रिंग रोड प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल, तसेच गडचिरोली शहराचा *नियोजित, सुरक्षित आणि संतुलित विकास* साध्य होईल. त्यामुळे या प्रकल्पाला त्वरित *प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देऊन कामाला सुरुवात करावी,* अशी ठाम मागणी नगराध्यक्षा निंबोरकर यांनी सहपालकमंत्र्यांकडे केली. या प्रकल्पासाठी प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान केवळ रिंग रोडच नव्हे, तर *गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवरही सखोल चर्चा करण्यात आली*. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, नागरी सुविधा, नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक योजनांबाबत सविस्तर मंथन झाले.
या सदिच्छा भेटीप्रसंगी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, स्वीकृत नगरसेवक सागर निंबोरकर, नगर परिषद सभापती सीमा कन्नमवार, नगरसेविका ज्ञानेश्वरी धंदरे, अर्चना निंबोड, वर्षा शेडमाके, नगर परिषद उपसभापती सीमा हेमके, पल्लवी बारापात्रे, तसेच भाजपा कार्यकर्ते व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, ठाम भूमिकेमुळे आणि नागरिककेंद्री विचारातून गडचिरोली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असून, रिंग रोड प्रकल्पाला लवकरच गती मिळेल, असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.








