चंद्रपूर
मागासलेपणाची मळकट चादर ओढून विकासाकडे आसूसलेल्या नजरेने गोंडपिपरी तालुका बघत आहे.शेकडो प्रश्नाचे व्रण अंगावर असलेल्या या तालुक्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे दिव्य अद्याप लोकप्रतिनिधीना जमले नाही. गावनेत्यांनी स्वतःचा विकास साधला मात्र तालुक्याचे प्रश्न आपल्या नेत्याकडे हक्काने सांगितले नाही.
आता हेच बघा, धाबा – गोंडपिपरी मार्गाचे काम पाच वर्षानंतरही पूर्णतःवास गेलेले नाही. तसा म्हणायला हा राज्यमार्ग. मध्यंतरी भाजपाचा पदाधिकाऱ्यांनी या मार्गाचा प्रश्न मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कानावर टाकला. अनेक महिने बंद असलेले मार्गाचे काम पुन्हा सुरु झाले. तेही गोगलगायच्या गतीने. पुन्हा काम बंद झाले. तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम करण्याचा इशारा दिला. नाही म्हणायला काम सुरू झालं. खरा प्रश्न हा आहे की कामाला विलंब का होतो आहे ?
भंगाराम तळोधी – हिवरा मार्गाचा दर्जा बघता त्यामानाने धाबा मार्ग भातातील खड्यासारखा आहे. एक तर दर्जाहीन काम त्यात त्यात होणारा विलंबामुळे परिसरातील नागरिक जाम संताप व्यक्त करतात. खरंतर हा प्रश्न काँग्रेस अथवा भाजपाचा नाही. हा प्रश्न सर्वांचा आहे. काँग्रेस आंदोलन करीत असेल तर पक्ष वाद विसरून सर्वांनी आंदोलनात सहभाग घ्यायला हवं. या मार्गाच्या दुर्दशेमुळे काहींना जीव गमवावा लागला. ती वेळ पुन्हा कुणावर येऊ नये, यासाठी एक मुखाने आवाज करायला हवा.

