
संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प;नगराध्यक्षा अँड प्रणोती निंबोरकर यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत संविधान दिन साजरा!
गडचिरोली | प्रतिनिधी, दि. २६ नोव्हेंबर २०२६ : संविधान उत्सव समितीच्या वतीने गडचिरोली शहरातील संविधान चौक येथे संविधान दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान करणारे महान दस्तऐवज आहे. संविधानाने नागरिकांना केवळ अधिकारच दिले नाहीत, तर देशाप्रती असलेल्या कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करून त्यातील मूल्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात आचरण करणे आवश्यक आहे, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी संविधानिक मूल्यांचे संवर्धन करणे आणि सामाजिक एकोपा टिकवून ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, नगरसेवक बाळू टेंबुर्णे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरकुमार खंडारे, रमेश सोनपिपरे, चंद्रशेखर भडांगे, कुसुमताई आलाम आणि संजय भसारकर उपस्थित होते.








