
गुरुद्वाराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर
गोकुळनगर येथे गुरुनानक जयंतीनिमित्त लोकप्रतिनिधींची गुरुद्वाराला भेट; शीख बांधवांना दिल्या शुभेच्छा
गडचिरोली | प्रतिनिधी : शहरातील गोकुळनगर परिसरातील श्री गुरुनानक गुरुद्वाराला गुरुनानक जयंतीनिमित्त नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे आणि नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी मान्यवरांनी गुरुद्वारा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित शीख बांधवांशी संवाद साधत गुरुनानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गुरुद्वारा समितीच्या वतीने लोकप्रतिनिधींचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले.
गोकुळनगर परिसरातील शीख बांधवांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणार असून, गुरुद्वाराच्या विकासासाठी वैयक्तिक स्तरावर तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. आवश्यक विकासकामांसाठी पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी यावेळी दिली.
श्री गुरु नानक देवजी यांनी दिलेला मानवता, समानता, बंधुभाव, निःस्वार्थ सेवा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश संपूर्ण समाजाला एकतेच्या सूत्रात बांधणारा आहे. त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
यावेळी मंगलसिंग पटवा, सुनीलसिंग पटवा, राजेंद्रसिंग प्रधानी, गुरुमानसिंग, गुरुदेवसिंग प्रधानी यांच्यासह गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी, शीख बांधव, भगिनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गुरुपर्व साजरे करण्यात आले.








