
हेमंत बोरकुटे यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सोहळा उत्साहात;माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती!
भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन भाविकांना दिल्या शुभेच्छा
गडचिरोली : गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे यांच्या निवासस्थानी आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. देवराव होळी यांनी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली. तसेच उपस्थित भाविकांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. भगवान श्रीकृष्णाने दिलेला धर्म, कर्तव्य, सत्य आणि मानवकल्याणाचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आत्मसात करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेमंत बोरकुटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सामूहिक सहभागाची भावना अधिक दृढ करणारा उत्सव असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. धार्मिक परंपरेनुसार गोपाळकाला साजरा करण्यात आला. उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतल्याने संपूर्ण सोहळा आनंद आणि उत्साहात पार पडला.
यावेळी हेमंत बोरकुटे, आकाश सातपुते, मोरेश्वर भांडेकर, सुरज गुंडमवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








