
गडचिरोलीच्या विकासासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चा संकल्प
जिल्हा वर्धापन दिनानिमित्त प्रगतीशील शेतकरी, उद्योजक, पत्रकार, समाजसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान
गडचिरोली – दि. २६ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्याच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृह येथे *‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’* च्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे सादरीकरण व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रगतीशील शेतकरी, नवउद्योजक, उद्योजक, महिला उद्योजक, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, समाजसेवक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या (NGO) प्रतिनिधींचा शिल्ड, डायरी, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे मुख्य प्रवर्तक, भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित नागरिकांना ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे सादरीकरण केले. यावेळी १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी मांडलेल्या सूचना, संकल्पना व विकासाच्या दिशांचा आढावा उपस्थितांसमोर मांडण्यात आला.
जिल्हा निर्मितीसाठी योगदान देणाऱ्यांना अभिवादन
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगस्ट १९८२ रोजी झाली. स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी कै. बाबुराव मडावी, माजी खासदार मारोतराव कोवासे आणि माजी आमदार पेंटराम तलांडी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी स्मरण करण्यात आले.
जिल्हा निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानून त्यांना अभिवादन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला आज ४४ वर्षे पूर्ण झाली असून, या कालखंडात जिल्ह्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांतील असंख्य व्यक्तींनी योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करीत आता पुढील वाटचाल अधिक व्यापक विकासाच्या संकल्पाने करण्याची गरज असल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले.
‘गडचिरोली २०४७’साठी ठोस विकास आराखडा
४४ व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा सन २०४७ पर्यंत विकसित, सक्षम आणि समृद्ध करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी विविध क्षेत्रांसाठी ठोस उद्दिष्टे आणि विकासाचा आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएएस-आयपीएस अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनापासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने केंद्र व राज्य शासनाचे निर्णय, नियम आणि आपल्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास गडचिरोलीच्या विकासाला मोठी गती मिळू शकते. शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अहेरीला अधिक प्रशासकीय अधिकार देण्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच अहेरी उपविभागातील नागरिकांना प्रशासन अधिक जवळून उपलब्ध व्हावे, यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहेरी निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या कार्यालयाला शासनाच्या आदेशानुसार आवश्यक प्रशासकीय व इतर अधिकार पूर्णपणे उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
अहेरी उपजिल्ह्याला आवश्यक प्रशासकीय व आर्थिक अधिकार मिळवून देण्यासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या माध्यमातून गडचिरोलीकरांच्या सहकार्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले.
स्वतंत्र ‘शैक्षणिक विकास आराखडा’ तयार करण्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ‘शैक्षणिक विकास आराखडा – गडचिरोली २०४७’ तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे टप्प्याटप्प्याने डिजिटल शाळांमध्ये रूपांतर करणे, गडचिरोली शहरातील नेहरू शाळेच्या धर्तीवर निवडक शासकीय शाळांचा आधुनिक व डिजिटल पद्धतीने विकास करणे, तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे डिजिटल आणि मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करणे, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, आधुनिक शिक्षण पद्धती, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा व ग्रंथालये उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
‘गोंडवाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ नामकरणाचा मानस
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र आरोग्य विकास आराखडा आवश्यक असल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले.
गडचिरोली येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे नामकरण करण्यासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची प्रक्रिया गतीने पूर्ण करून जुन्या जागेवर किंवा शासनाने निश्चित केलेल्या नवीन जागेवर तातडीने बांधकाम सुरू करण्यात यावे, यासाठी गडचिरोलीकरांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वास येईपर्यंत जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करून नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्नांचा निर्धार
शिक्षण, आरोग्य, प्रशासन, रोजगार, शेती, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधून सन २०४७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविणे हा ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चा प्रमुख संकल्प असल्याचे डॉ. देवराव होळी यांनी सांगितले.
गडचिरोलीच्या विकासासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, उद्योजक, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास निश्चितपणे साध्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालक लोक कलावंत विजय शेंडे व आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके यांनी केले.
‘४४ वर्षांचा प्रवास, विकसित गडचिरोलीसाठी नव्या संकल्पाची सुरुवात’ असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.








