Home Breaking News जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला राज्य सरकारने प्राधान्य द्यावे; गावागावातील क्रीडांगणांची आवश्यक व्यवस्था करावी...

जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला राज्य सरकारने प्राधान्य द्यावे; गावागावातील क्रीडांगणांची आवश्यक व्यवस्था करावी — डॉ. प्रणय खुणे

0
17

जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला राज्य सरकारने प्राधान्य द्यावे; गावागावातील क्रीडांगणांची आवश्यक व्यवस्था करावी — डॉ. प्रणय खुणे

 

फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्याची मागणी

 

घोट, दि. २४ ऑगस्ट २०२६ : गडचिरोली जिल्ह्यात फुटबॉल खेळाची मोठी परंपरा असून ग्रामीण भागातील अनेक युवा खेळाडूंमध्ये उत्कृष्ट गुणवत्ता आहे. या खेळाडूंना योग्य सुविधा आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला प्राधान्य द्यावे. तसेच गावागावातील क्रीडांगणांची सुयोग्य व्यवस्था करून खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली.

 

घोटजवळील शामनगर येथे स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ, शामनगर यांच्या वतीने भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष विलास उईके होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक केंद्रे सर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, महेश विश्वास, किशोर कुंडू, महामंत्री पलाश घरामी, वनकर गुरुजी, मंडल गुरुजी, कृष्णकांत विश्वास, विलास वडेट्टीवार, निरंजन ढाली, उत्तम मंडल यांच्यासह गावातील मान्यवर व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थितांना डॉ. प्रणय खुणे, विलास उईके, कृष्णकांत मंडल आणि रमेश अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना डॉ. प्रणय खुणे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात फुटबॉल खेळाची मोठी आवड असून अनेक युवक या खेळात मेहनत घेत आहेत. मात्र, खेळाडूंना सरावासाठी योग्य मैदान, आवश्यक क्रीडा साहित्य आणि स्पर्धांच्या पुरेशा संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.

 

“फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर नियमित स्पर्धांचे आयोजन करावे. गावागावातील क्रीडांगणांची आवश्यक दुरुस्ती व विकास करून खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मागणी लावून धरणार,” असे प्रतिपादन डॉ. प्रणय खुणे यांनी केले.

 

कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच सजल विश्वास यांनी केले, तर आभार उपसरपंच समिरण रॉय यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिंपकर हलदार, उपाध्यक्ष राहुल मंडल आणि संचालक महेंद्र मंडल यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेला परिसरातील क्रीडाप्रेमी, युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!