
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्या इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे सर्वपक्षीय भावनापूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन”
गडचिरोली :महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उद्या दि. 29 जानेवारी 2026 रोजी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सायंकाळी ठीक 5.00 वाजता सर्वपक्षीय भावनापूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या श्रद्धांजली कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, लोकाभिमुख धोरणे, तसेच जनतेशी असलेले नाते यांचा यावेळी आदरपूर्वक उल्लेख करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
सदर श्रद्धांजली कार्यक्रमाबाबतची माहिती देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच नगर परिषद पाणीपुरवठा समितीचे सभापती लिलाधर भरडकर यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री यांचे कार्य सर्वपक्षीय पातळीवर प्रेरणादायी होते. त्यामुळे हा कार्यक्रम सर्वपक्षीय असून राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाद्वारे सामाजिक एकोपा, सलोखा व लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असेही आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.








